निवडणुकीच्या प्रचारात ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर

बेल्हे | सुधाकर सैद : निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला असून प्रत्येक उमेदवार आपली प्रचार वाहने आपापल्या मतदारसंघातून काढत असताना लाउडस्पीकरवर घोषणाबाजी करीत आहे, प्रचाराची गाणी वाजवत आहे. हे कमी म्हणून की काय, कार्यकर्ते जागृत राहावेत एका एका वाहनाला चारचार मोठमोठे भोंगे, दोनदोन स्पीकर लावले आहेत. यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे प्रशासनाने चक्क कानाडोळा केला असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी बेल्हे परिसरातील दक्ष नागरिकांनी केल्या आहेत.
सध्या परीक्षांचे दिवस सुरू असून शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी अभ्यास करीत असताना वरचेवर उमेदवारांच्या वेगवेगळ्या भागातील प्रचार करणाऱ्या वाहनांच्या भोंग्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. जवळपास सर्वच प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना वाजतगाजत मिरवणुका काढल्या व दणदणाट केला. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा प्रचाराचा जोर वाढला. मंगळवारी (दि.३) दुपारी प्रचार संपत असल्यामुळे शेवटच्या दोनचार दिवसांपासून उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. उमेदवारांच्या दिवसा व सायंकाळी निघणाऱ्या प्रचाररॅलीतून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे बेल्हे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
याशिवाय काही भागात जाहीर सभांचेही आयोजन केले असून त्याकरिता घोषणा देत येणारे कार्यकर्ते व सभेपूर्वी लावली जाणारी प्रचारगीते यामुळे त्या परिसरातील वृद्ध, विद्यार्थी तसेच रुग्णांना त्रास होत आहे.
या ध्वनिप्रदूषणाबाबत राजकीय पक्ष जबाबदारीने वागत तर नाहीच, परंतु प्रशासनही दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. एरव्ही गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, गुढीपाडव्यातील ढोलताशांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत ओरड करणारे तथाकथिक पर्यावरणवादीही या प्रचार वाहनातून केल्या जाणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून ध्वनिप्रदूषणाचे नियम सण-उत्सवाबरोबरच निवडणुकीच्या प्रचारालाही लागू होतात परंतु निवडणूक काळातच हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
ध्वनिमर्यादा ही सगळीकडे सारखीच लागू असते, अगदी निवडणुकीच्या प्रचारालाही तोच नियम लागू असून रहिवासी परिसर, रुग्णालय परिसर, औद्योगिक क्षेत्र आणि शांतता क्षेत्र या ठिकाणी आवाज किती ठेवायचा यासंदर्भात नियम ठरलेले आहेत परंतु ते नियम मोडण्यासाठीच असावेत असेच सध्या चाललेल्या ध्वनीप्रदूषित प्रचारावरून वाटते.



