बांगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

बेल्हे | सुधाकर सैद : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बांगरवाडी शिवारातील गणविहीर मळ्यातील रामभाऊ राणू बांगर यांच्या घराशेजारी असणाऱ्या बंदिस्त गोठ्यामध्ये गोठ्यातील बिबट्यांच्या भयंकर हल्ल्यात सात शेळ्या जागीच ठार झाल्या असून, बंदिस्त असलेल्या गोठ्यामध्येही बिबट्या हल्ला करत असल्याने शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे ठेवायची कुठे आणि कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हा हल्ला दोन ते तीन बिबट्यांचा सामूहिक हल्ला असण्याची शक्यता बांगरवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबू बांगर व्यक्त केली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास एक ते सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
याच्या अगोदरही या परिसरातील ग्रामस्थांनी आमच्या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे, तरी वन विभागाने या परिसरात पिंजरे लावून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली होती परंतु सदर मागणीला बेल्हे वनविभागाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही कालची घटना घडली असून, आज वनखात्याने तातडीने त्या ठिकाणी पिंजरा लावला असून वन खात्याचे हे वागणे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असेच म्हणावे लागेल.




