पुणे विभागमहाराष्ट्रसामाजिक

धामणीच्या शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा

उपसा जलसिंचन योजनेच्या वीज जोडणी प्रश्नावर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

पारगाव | प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील धामणी, पहाडदरा व परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून उभारलेल्या महत्त्वाकांक्षी उपसा जलसिंचन योजनेच्या वीज जोडणीचा प्रश्न अखेर राज्य सरकारच्या उच्चस्तरावर पोहोचला असून, या प्रश्नावर मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याने धामणी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई येथे झालेल्या या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी धामणी गावातील शेतकरी प्रतिनिधींनी उपसा जलसिंचन योजनेसमोरील अडचणी, वीज जोडणीचा रखडलेला प्रश्न तसेच शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर मांडणी केली.

उपोषणानंतर प्रश्नाला मिळाली गती

धामणी गावातील शेतकऱ्यांनी उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज जोडणी मिळावी या प्रमुख मागणीसाठी नुकतेच तीन दिवस अन्नत्याग आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केले होते. गावचे माजी सरपंच सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते.

त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठीच धामणी येथील शेतकरी बांधवांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

अधिकाऱ्यांना धामणी भेटीचे आदेश

बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांना संबंधित अधिकाऱ्यांसह तात्काळ धामणी येथे भेट देण्याचे निर्देश दिले. तसेच या योजनेचे पाणी सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील शेतीपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

लोकसहभागातून उभारलेली कोट्यवधींची योजना

धामणी, पहाडदरा आणि परिसरातील तब्बल ४२८ शेतकरी कुटुंबांनी कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता स्वतःच्या आर्थिक योगदानातून ही उपसा जलसिंचन योजना उभारली आहे. या योजनेसाठी सुमारे ६५ किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली असून त्यावर ६ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे सुमारे ९७८ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून जवळपास १,८९१ नागरिकांच्या उपजीविकेला थेट फायदा होणार आहे. मात्र आवश्यक वीज जोडणी उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद अवस्थेत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या मोठ्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सोलर आणि हायब्रिड पर्यायावरही चर्चा

बैठकीत या योजनेला सौर ऊर्जेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याच्या पर्यायावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सोलर ऊर्जेवर योजना पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नसल्यास विशेष बाब म्हणून हायब्रिड पद्धतीने योजना राबवून आवश्यक वीज कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यामुळे केवळ वीज जोडणीचा प्रश्नच मार्गी लागणार नसून भविष्यात योजनेच्या दीर्घकालीन शाश्वततेलाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

या बैठकीस युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना युवानेते रमेश येवले, उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, माजी सरपंच सागर जाधव, सरपंच रविंद्र वळसे पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दाखविलेली संवेदनशीलता, तत्परता आणि सकारात्मक भूमिका याबद्दल उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी लवकरच धामणी गावाला भेट देणार असल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धामणी परिसरातील अनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या दिशेने या बैठकीमुळे महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात असून, उपसा जलसिंचन योजना लवकरच कार्यान्वित होऊन शेतीला पाणी मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button