प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा तब्बल १० लाखांचा साठा जप्त
काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; एकाला अटक; बंद खोलीतून सुरू होता अवैध साठा आणि पुरवठा, एफडीएच्या विशेष मोहिमेत पुण्यात १२८ ठिकाणी कारवाई

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी, पानमसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा प्रहार करत तब्बल १० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, बंद खोलीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून परिसरातील विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
काळेपडळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डेरे कंपनीजवळील केजारमट वस्ती, हडपसर परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस हवालदार अमोल फडतरे आणि महादेव शिंदे यांनी सापळा रचला.
यावेळी शेराराम कानाराम देवासी (वय २४, रा. संकल्पविहार, काळेपडळ, हडपसर) याला संशयास्पदरीत्या गुटखा घेऊन जात असताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुरुवातीला सुमारे १५ हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला.
चौकशीतून उघड झाला मोठा साठा
अधिक चौकशीदरम्यान आरोपीने हा माल त्याचा मित्र सोगाराम परमार (वय ३३) याने विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी काळेपडळ परिसरातील केतकेश्वर कॉलनीतील एका बंद खोलीवर छापा टाकला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी, पानमसाला आणि विविध तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आला होता. या छाप्यात पोलिसांनी एकूण १० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा माल परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना पुरविण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (COTPA) अधिनियम, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आदी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असून, पुरवठा साखळीचा तपासही सुरू आहे.
एफडीएची विशेष मोहीम; पुण्यात महिनाभरात १२८ ठिकाणी कारवाई
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गेल्या महिनाभरात पुणे विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांच्या गैरव्यवहाराविरोधात विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेत १२८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये:
- ७७ गुन्हे नोंद
- २३ आरोपींना अटक
- ६७ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा-पानमसाला जप्त
- ३७ वाहने जप्त
- निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थांवर ९९३ प्रशासकीय कारवाया
- कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा आणि औषधे जप्त
अशा मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली आहे.
पोलिसांच्या पथकाचे कौतुक
ही यशस्वी कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बैनिवाल, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासाहेब बाबर, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गरुड, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, महादेव शिंदे तसेच तपास पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील पुणे पोलिसांची मोठी यशस्वी मोहीम मानली जात असून, अशा प्रकारच्या रॅकेटवर आगामी काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



