पुणे विभागमहाराष्ट्रसामाजिक

किल्ले चावंड अर्थात प्रसन्नगडावर खा. निलेश लंके यांच्यासह ‘मावळ्यांकडून श्रमजागर

खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ठरला चर्चेचा विषय; शाळेत मुक्काम, बैलगाडीतून मिरवणूक अन् लेझीमच्या तालावर स्वागत

 

जुन्नर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणाऱ्या शिवकालीन गड-किल्ल्यांचे स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प घेऊन खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गडकोट संवर्धन मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि. २७) जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक चावंड किल्ला अर्थात प्रसन्नगडावर पार पडला. खासदार डॉ. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांनी गडावर पोहोचत स्वच्छता, संवर्धन आणि डागडुजीच्या कामात सहभाग घेतला.

या मोहिमेसाठी खासदार निलेश लंके यांचे शनिवारी रात्रीच शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये आगमन झाले. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, खासदार असूनही त्यांनी हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये मुक्काम न करता चावंड येथील प्राथमिक शाळेत रात्रीचा मुक्काम केला. त्यांच्या या साधेपणाची परिसरात विशेष चर्चा झाली.

रविवारी सकाळी चावंड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. खासदार लंके यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महिलांच्या लेझीम पथकाने लेझीमच्या तालावर ठेका धरत त्यांचे स्वागत केले. पारंपरिक वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीमुळे चावंड परिसरात शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेचा उत्साह अधिक वाढला.

यानंतर खासदार लंके यांच्यासह हजारो मावळ्यांनी चावंड किल्ल्यावर जाऊन स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. गडावरील विविध भागांमध्ये स्वच्छता करण्यात आली तसेच आवश्यक ठिकाणी डागडुजीची कामे करण्यात आली. केवळ भाषण किंवा आवाहन न करता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदानातून गडसंवर्धनाचा संदेश दिला.

या मोहिमेस पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, विद्यमान सदस्या माई लांडे, सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे, युवा नेते अमोल लांडे, सरपंच सुमन लांडे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी आणि हजारो मावळे उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी खासदार निलेश लंके यांच्या गडकोट संवर्धनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या कार्यात आपणही ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून खासदार लंके यांच्या सोबत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे यांनीही गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे कौतुक केले. माई लांडे यांनी खासदार लंके हे आपले आदर्श असल्याचे सांगितले. सरपंच सुमन लांडे यांनी चावंड परिसराच्या विकासासंदर्भातील विविध मागण्या खासदार लंके यांच्यासमोर मांडल्या.

गड-किल्ले जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी : खा. लंके
गडकोट संवर्धन मोहिमेत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, आपण आमदार, खासदार किंवा कोणतीही विशेष व्यक्ती आहोत, ही भावना बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते, हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. गड-किल्ले हे केवळ पर्यटनाची ठिकाणे नसून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या जिवंत पाऊलखुणा आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनासोबतच समाजाचाही सहभाग आवश्यक असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

किल्ले चावंड अर्थात प्रसन्नगडावर हजारो मावळ्यांनी केलेले श्रमदान आणि संवर्धनाचा हा उपक्रम गडकोटांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. गड स्वच्छ ठेवणे, त्याचे ऐतिहासिक महत्त्व जपणे आणि पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवणे, हा सामूहिक संकल्प या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button