पुणे विभागमहाराष्ट्र

३५१ फुटी तिरंगा यात्रेने जुन्नर शहर दुमदुमले; युवा शक्तीचा राष्ट्रनिर्माणाचा संदेश

जुन्नर | प्रतिनिधी 

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जुन्नर शहराच्या वतीने ३५१ फुटी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत जुन्नर शहरातील युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश दिला.

आजच्या युवा पिढीसमोर विविध माध्यमांमधून नकारात्मक विचार आणि वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देणे, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि देशसेवेची भावना निर्माण करणे, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा तिरंगा यात्रेचा उद्देश होता.

या यात्रेत शंकरराव बुट्टे महाविद्यालय, श्री शिवछत्रपती महाविद्यालय, प्रज्ञान करिअर अकॅडमी, लक्ष करिअर अकॅडमी, श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस भरती अकॅडमी यांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील विविध राष्ट्रप्रेमी संघटना, नागरिक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनीही यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

३५१ फुटी तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या युवकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी जुन्नर शहर दुमदुमून सोडले. तिरंग्याच्या माध्यमातून युवकांनी भारतीय राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान व्यक्त करत राष्ट्रभक्तीचा जागर केला.

माजी सैनिकांचा विद्यार्थ्यांना सहवास

यात्रेदरम्यान माजी सैनिक संघ, जुन्नरच्या माजी सैनिकांची विशेष उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. देशाच्या रक्षणासाठी आयुष्यातील महत्त्वाचा काळ समर्पित केलेल्या माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.

माजी सैनिक उमेश अवचट यांनी विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला महत्त्वाचा अधिकार असून त्याचा वापर जबाबदारीने आणि विधायक पद्धतीने केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

युवकांनी आपल्या विचारांचा उपयोग सामाजिक प्रबोधन, सकारात्मक परिवर्तन, देशहिताचे प्रश्न मांडणे आणि राष्ट्रनिर्माणासाठी करावा. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर समाजोपयोगी आणि सकारात्मक कार्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘Gen-Z’ पिढीने संस्कृती आणि राष्ट्रभावनेशी जोडलेले राहावे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय सेवार्थ विद्यार्थी प्रमुख भवानी शंकर शर्मा यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. आजची Gen-Z पिढी आधुनिक विचारांची आणि तंत्रज्ञानस्नेही असली तरी तिची भारतीय संस्कृती, संस्कार आणि राष्ट्रभावनेशी असलेली नाळ कायम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि देशातील महापुरुषांचे विचार व संस्कार सोबत घेऊन वाटचाल करणारा युवा देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा आधार ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

युवकांनी केवळ सोशल मीडिया आणि आभासी जगापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजजीवनात सकारात्मक योगदान द्यावे, सामाजिक प्रश्न समजून घ्यावेत आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपली भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख मनोहर चव्हाण, जिल्हा संयोजक दर्शन सोनवणे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी, माजी सैनिक, राष्ट्रप्रेमी नागरिक तसेच सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘राष्ट्र प्रथम’चा संदेश

३५१ फुटी तिरंगा यात्रेच्या माध्यमातून युवकांच्या मनामध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजवण्याचा तसेच सकारात्मक, संस्कारी आणि जबाबदार युवा शक्ती उभी करण्याचा संदेश देण्यात आला. जुन्नर शहरातील युवकांनी एकजुटीने व्यक्त केलेली राष्ट्रभक्ती आणि तिरंग्याविषयीचा अभिमान या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button