आंबेगावात पत्रकाराला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावच्या हद्दीत अष्टविनायक रस्त्यालगत जमिनीच्या ताब्याचे व्हिडिओ चित्रीकरण आणि वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पारगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्वजित अनंथा गवारी (वय ३५, रा. मंचर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार दिपाली राजेंद्र बगाटे, मुकुंद सावळेराम पोहकर, शिवाजी किसन बगाटे आणि कुंडलिक मोतीराम बगाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे संपादक ज्ञानेश्वर सुरेश खिरड यांच्या सांगण्यावरून बाळू शिवहरी पोहकर यांच्या जमिनीच्या ताब्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी नागापूर येथे गेले होते. त्यावेळी दिपाली बगाटे यांनी हाताने मारहाण केली, तर इतर तिघांनीही मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच मोजणी आणि ताब्याच्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण किंवा वार्तांकन करू नये, यासाठी अडवणूक करण्यात आली. चित्रीकरण किंवा वार्तांकन केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पारगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३६ वाजता स्टे.डा. नं. १२/२०२६ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



