पुणे विभागमहाराष्ट्र

मंचरमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

ज्येष्ठ नेते संजय थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांची मोठी गर्दी; आंबेगाव तालुक्यातील महिलांना प्रमाणपत्र मोफत काढून देणार

मंचर प्रतिनिधी : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत राज्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंचर शहरातील ज्येष्ठ नेते संजय जिजाबा थोरात यांच्या जनसेवा जनसंपर्क कार्यालयात बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अर्ज भरण्यासाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेतीच्या कामात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी, तसेच विविध शासकीय कृषी योजना, अनुदाने आणि कृषीविषयक सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने महिला शेतकरी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीमध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना शासकीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

कृषी योजनांचा लाभ घेणे होणार सुलभ
यावेळी संजय थोरात म्हणाले की, महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे पात्र महिलांना कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदाने, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण तसेच इतर कृषी सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत ओळख मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक शासकीय योजनेसाठी स्वतंत्र पात्रता निकष लागू राहणार असले तरी प्रमाणपत्रामुळे महिलांना कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांच्या प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ होईल.

शेतीसोबतच पशुपालन, फलोत्पादन, मत्स्य व्यवसाय आणि इतर शेतीपूरक व्यवसायांमध्ये योगदान देणाऱ्या पात्र महिलांनाही या प्रमाणपत्राच्या माध्यमातून अधिकृत शेतकरी ओळख मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील महिलांना प्रमाणपत्र मोफत

सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील माता-भगिनींना संजय थोरात यांच्या माध्यमातून महिला शेतकरी प्रमाणपत्र मोफत काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी इच्छुक महिलांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अद्ययावत सातबारा उतारा, आठ-अ उतारा, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वयंघोषणापत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह जनसेवा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतानाच शेतीच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाला अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पात्र महिलांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button