शिरदाळेत वृक्षरोपणाचा उपक्रम उत्साहात; तलाव सुशोभीकरणासह पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

मंचर प्रतिनिधी
शिरदाळे गावातील ऐतिहासिक तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ आणि समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षरोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच गावाच्या नैसर्गिक वारशाचे जतन करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शिरदाळे गावालगत असलेला ऐतिहासिक तलाव हा गावासाठी जीवनदायिनी ठरला असून वर्षातील ३६५ दिवस गावाची तहान भागविण्याचे महत्त्वाचे कार्य हा तलाव करत आहे. या तलावाचे सुशोभीकरण व्हावे, परिसर अधिक हिरवागार व्हावा आणि भावी पिढीसाठी पर्यावरणाचा समृद्ध वारसा निर्माण व्हावा, या उद्देशाने गावातील तरुणांनी एकत्र येत वृक्षरोपणाचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमाला शिवऋण महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे, दैनिक ‘सामना’चे उपसंपादक विठ्ठलराव जाधव, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष बाबाजी चासकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, सरपंच सागर जाधव पाटील, दैनिक ‘प्रभात’चे पत्रकार अंकुश भुमकर यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित प्रत्येक मान्यवराचा रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही अभिनव संकल्पना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली.
यावेळी गावालगत असलेल्या धामणी येथील खंडोबाचे मूळस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागदरा परिसरातील विकासकामांचाही गौरव करण्यात आला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या स्थळी चंपाषष्ठी उत्सव आणि यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, हा परिसर खोल दरीत असल्यामुळे भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत तरुण आणि महिला भगिनींच्या सहकार्याने सागदरा येथे सुंदर व सुरक्षित रस्ता तयार केला आहे. या लोकसहभागातून झालेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित ग्रामस्थांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. भविष्यातही गावातील नैसर्गिक संपत्तीचे जतन, तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि वृक्षसंवर्धनासाठी अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या सर्व सदस्यांनी तसेच समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे शिरदाळे गावात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



