पुणे विभागमहाराष्ट्र

पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी यांची तत्परता | प्रत्यक्ष उभे राहून पुलाची दुरुस्ती

निमदरी पुलावरील काम पूर्ण होईपर्यंत पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी स्वतः उपस्थित

जुन्नर प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्ते, मोऱ्या आणि पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल प्रसिद्ध झालेल्या बातमीत पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, या संदर्भात अधिक माहिती समोर आली असून त्यानुसार त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर प्रशासनाला तातडीने कामाला लावत नुकसानग्रस्त ठिकाणांची डागडुजीही करून घेतली.

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या निमदरी येथील नदीवरील पुलाची पाहणी केल्यानंतर संजय वऱ्हाडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पुलावरील आवश्यक डागडुजीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले.

याशिवाय नुकसानग्रस्त रस्त्यांचीही दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. विशेष म्हणजे, निमदरी पुलावरील काम पूर्ण होईपर्यंत पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ते तेथे थांबून कामाचा आढावा घेत होते, त्यामुळे दुरुस्तीची कामे तत्परतेने पूर्ण होण्यास मदत झाली.

दरम्यान, त्यांनी रेणुका माता मंदिरात शिरलेल्या पाण्याचीही पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशी भूमिका त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली.

सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेती, रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीची कामे करून घेण्याच्या संजय वऱ्हाडी यांच्या भूमिकेची स्थानिक नागरिकांकडून दखल घेतली जात आहे.

Screenshot

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button