क्राईमपुणे विभागमहाराष्ट्र

संतापजनक! वृद्ध महिलेला JCB च्या बकेटने उचलून आपटले, वृद्धाच्या डोक्यात दगड घातला, गायींचा गोठा पाडला

मंचर पोलीस ठाण्यात अंदाज घेऊन कारभार?

मंचर | प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जमीन वादातून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला JCB च्या बकेटमध्ये उचलून खाली आपटल्याचा, ७७ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा आणि गायींचा गोठा जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावातील कोकणेवस्ती येथील रहिवासी अरुण पंढरीनाथ कोकोणे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबाची अनेक वर्षांपासून शेती असून गट क्रमांक ९४१/२३/२ या जमिनीवर त्यांचा जनावरांचा गोठा आहे. तक्रारीनुसार, २४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीसह घटनास्थळी येऊन गोठा पाडण्यास सुरुवात केली.

फिर्यादीचा आरोप आहे की, या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला असता, ७० वर्षीय हिराबाई कोकोणे यांना थेट JCB च्या बकेटमध्ये उचलून खाली आपटण्यात आले. तर ७७ वर्षीय पंढरीनाथ कोकोणे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. याचवेळी महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा तसेच गायींच्या गोठ्याचे मोठे नुकसान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून; वयोवृद्ध पंढरीनाथ कोकणे यांच्या डोक्याला तब्बल सात टाके पडले असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. तक्रारीमध्ये काही व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर काही अनोळखी व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयातील उध्दट, उर्मट आणि कामचुकार महिला कर्मचारी 

दरम्यान मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका उद्घट महिला आरोग्य अधिकाऱ्याने वृद्ध पंढरीनाथ कोकणे यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांना घरी निघून जाण्याबाबत बजावले. डॉक्टरांच्या या उध्दट आणि अमानवी वर्तणुकीवर कोकणे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून थेट जेसीबीच्या साहाय्याने गोठा पाडण्यात आला. त्यामुळे जनावरांचे नुकसान झाले असून कुटुंब बेघर होण्याची वेळ आल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने मंचर पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप संबंधित दुसऱ्या पक्षाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून, तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

जमिनीच्या वादातून एका वृद्ध महिलेला JCB च्या बकेटने उचलून आपटल्याचा, वृद्धावर जीवघेणा हल्ला केल्याचा आणि जनावरांचा गोठा पाडल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.

मंचर पोलीस ठाण्यात अंदाज घेऊन कारभार?
दरम्यान मंचर पोलिसांनी तक्रारदाराचे लेखी म्हणणे घेतले असून; अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले आहे. मंचर पोलीस दलातील काही कनिष्ठ कर्मचारी विविध प्रकरणांतील पीडितांना हेलपाटे मारायला लावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. लेखी म्हणणे घेऊन आरोपींना बोलवून घेऊन तडजोडीचा अंदाज घेऊनच गुन्हा दाखल केला जातो अथवा गुन्ह्यातील कलमे कमी जास्त करण्याचे ठरवले जाते अथवा गुन्हा दाखल केलाच जात नसल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी 👆येथे टॅप करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button