आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी राजू जाधव यांची निवड

मंचर | प्रतिनिधी
आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी राज्य एम.एड. कृती समितीचे अध्यक्ष तथा भागडी गावचे सुपुत्र राजू जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे आंबेगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजू जाधव हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक, विद्यार्थी तसेच केंद्रप्रमुखांना वेळोवेळी शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करून त्यांनी प्रभावी नेतृत्वाची छाप निर्माण केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
राज्य एम.एड. कृती समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासकीय समन्वय कौशल्याचा लाभ आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या कामकाजाला होईल, असा विश्वास शिक्षकांमधून व्यक्त केला जात आहे.
राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रप्रमुखांमधील समन्वय अधिक बळकट होईल, शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळेल आणि तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, शिक्षक, केंद्रप्रमुख आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



