अक्षय महाराज भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; १४०० दिंड्यांना २.८० कोटींचे अनुदान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तात्काळ आदेश
वारकरी दिंड्यांसाठी मोठा दिलासा!

मुंबई | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा वारकरी संघटनेचे पदाधिकारी अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत मानाच्या दहा पालखी सोहळ्यांसोबत सहभागी होणाऱ्या सुमारे १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये या प्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यामध्ये आषाढी वारीतील पालखी सोहळा, दिंड्या आणि सेवाभावी वाहनांना राज्यातील सर्व टोल नाक्यांवरून टोलमाफी देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, दिंडी नोंदणी केलेल्या प्रत्येक दिंडीस २० हजार रुपयांचे अनुदान तातडीने वितरित करण्याबरोबरच यासंदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करण्याची विनंतीही करण्यात आली होती.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षी लाखो वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळ्यांमधून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या काळात दिंड्या, पालखी सोहळे आणि सेवाभावी वाहनांवर टोल शुल्काचा मोठा आर्थिक बोजा पडतो. तसेच, अनेक दिंड्यांना वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे भोजन, निवास, आरोग्य सेवा आणि वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांच्या व्यवस्थापनात आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार मानाच्या दहा पालखी सोहळ्यांबरोबर सहभागी होणाऱ्या सुमारे १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये या प्रमाणे २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वारकरी, दिंडी प्रमुख आणि सेवाभावी संस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, पालखी सोहळ्यातील टोलमाफीसंदर्भातही शासनस्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या निर्णयाबद्दल वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी हा निर्णय वारकरी परंपरेचा सन्मान करणारा असून, लाखो वारकऱ्यांना आणि दिंडी व्यवस्थापनाला मोठा आधार देणारा असल्याचे म्हटले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पालखी सोहळ्यांच्या व्यवस्थापनाला आर्थिक बळ मिळणार असून, वारकरी संप्रदायाच्या अनेक वर्षांच्या मागणीला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना वारकरी वर्तुळातून व्यक्त होत आहे.



