पुणे विभागसामाजिक

डी. एन. ताठे विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात

बालहक्क, कायदे व पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन

शिरूर दि. १८ : डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालय  येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. घोडनदी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी न्यायव्यवस्था, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य तसेच सामाजिक जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना कायद्याची प्राथमिक ओळख करून देत त्यांच्या दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांनी आपल्या भाषणात शिक्षण हा प्रत्येक मुलाचा कायद्याने संरक्षित मूलभूत अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींविषयी सतर्क राहावे, तसेच कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित शिक्षक किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. वीरेंद्र सावंत यांनी शालेय जीवनातच कायद्याचे ज्ञान असणे किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. अॅड. शालिनी शेळके यांनी बालतस्करी व भिक्षा प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करत त्यातील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
अॅड. ऋतुजा खोले यांनी बालकामगार प्रतिबंध कायद्याची माहिती देत, लहान वयात शिक्षण सोडून काम करणे किती घातक आहे, हे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचा सल्ला दिला.
पर्यावरण विषयावर बोलताना अॅड. वैशाली धोंगडे यांनी जागतिक तापमानवाढ, पर्यावरण संवर्धनाची गरज तसेच फास्ट फूड व कोल्डड्रिंक्सच्या अति सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  विमल झावरे व शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button