नाशिक विभाग

श्रीगोंद्यात खळबळ : बाळूमामा मंदिरात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

श्रीगोंदा | प्रतिनिधी: श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील ठाणगे वस्ती येथील बाळूमामा मंदिरामध्ये पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत मंदिरातील मौल्यवान दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील रुक्मिणी मातेच्या गळ्यातील सोन्याच्या मण्याचे अंदाजे 60 हजार रुपये किमतीचे डोरले, देवासमोरील सुमारे 3 लाख रुपये किंमतीच्या चांदीच्या पादुका, तसेच दानपेटीतील अंदाजे 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आसल्याचे समजते. ही घटना पहाटे पूजेसाठी मंदिरात आलेले पुजारी हनुमंत सुभाष ठाणगे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती देत बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, तसेच अहिल्यानगर येथील श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीचा तपास सुरू असून पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करीत आहे.
अलीकडच्या काळात परिसरात मंदिर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button