नाशिक विभागपुणे विभागमहाराष्ट्रराजकीय

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच?; माजी मंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमधे सकारात्मक चर्चा

मुंबई | प्रतिनिधी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला आता अधिक बळ मिळाले आहे. प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात करण्यात आलेले बदल रद्द करून पूर्वनियोजित मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

बैठकीदरम्यान प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन पूर्ण झालेले असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याची बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या बदलामुळे प्रकल्पाचा उद्देश आणि संबंधित भागांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत मूळ सरळ मार्ग पूर्ववत करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळामध्ये आमदार किरण लहामटे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार अमोल खताळ, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले यांचाही समावेश होता. विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी एकत्र येत प्रकल्प मूळ मार्गानेच पूर्ण करण्यासाठी एकमताने आग्रही असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी शंभर टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. तसेच जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी (GMRT) प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आधुनिक तांत्रिक उपायांचा अवलंब करून रेल्वे मार्ग शक्य तितक्या मूळ आराखड्यानुसारच ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, पुणे, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अकोले, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा प्रस्तावित मूळ सरळ मार्ग उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषी व व्यापारी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे हा मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीला स्थानिक नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींकडून व्यापक पाठिंबा मिळत आहे.

बैठकीनंतर शिष्टमंडळाने प्रकल्पाचा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाणार असून, राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पुन्हा मूळ सरळ मार्गानेच मार्गस्थ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, संबंधित भागातील नागरिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button