पंढरपूर भक्तनिवास उद्घाटनात आद्य प्रवर्तक स्व. किसनराव बाणखेले यांचे नाव वगळले. मंचरकरांकडून आत्मक्लेश

मंचर | प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या भक्तनिवास (धर्मशाळा) इमारतीचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिका, वृत्तपत्र जाहिराती तसेच कार्यक्रमाच्या कोनशिलेवर भक्तनिवास उभारणीसाठी सर्वप्रथम पुढाकार घेणारे आद्य प्रवर्तक, माजी खासदार लोकनेते स्व. किसनराव बाणखेले यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप करत मंचर येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. या निषेधार्थ शनिवारी मंचरमध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
मंचर ग्रामस्थांच्या मते, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळा अर्थात भक्तनिवासाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाची पायाभरणी झाली. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिका, प्रसिद्धी साहित्य आणि कोनशिलेवर त्यांचे नाव असणे अपेक्षित होते. मात्र संबंधित सर्व ठिकाणी त्यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा अवमान झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर मंचर येथील लोकनेते स्व. किसनराव बाणखेले स्मारक, नगरपंचायत परिसरात सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी स्व. बाणखेले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित संस्थेकडे व आयोजकांकडे भविष्यात स्व. किसनराव बाणखेले यांच्या कार्याची अधिकृत नोंद घेऊन त्यांना योग्य सन्मान द्यावा, तसेच भक्तनिवासाच्या इतिहासात त्यांचे नाव कायमस्वरूपी समाविष्ट करावे, अशी मागणी केली. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनामुळे मंचर परिसरात या विषयाची मोठी चर्चा रंगली असून, भक्तनिवासाच्या उभारणीत नेमके कोणाचे योगदान किती होते, याबाबतही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी इतिहासाशी छेडछाड न करता ज्यांचे योगदान आहे त्यांना योग्य तो सन्मान देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.



