नाशिक विभाग

मयत कुणाल दरेकरला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

श्रीगोंदा | प्रतिनिधी : हिरडगाव फाटा–घोडेगाव शिवारात दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण अपघातात मयत झालेल्या कुणाल शांतीलाल दरेकर (वय १९) यास न्याय मिळावा तसेच अपघातातील आरोपी व वाहन शोधून अटक करावी या मागणीसाठी हिरडगाव ग्रामस्थांसह मयताचा पिता शांतीलाल काशिनाथ दरेकर यांनी आज तहसिलदार कार्यालय श्रीगोंदा येथे उपोषणाला करण्यात आले.

या संदर्भात शांतीलाल दरेकर यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघाताच्या दिवशी कुणाल व त्याचा मित्र सुमंत दरेकर हे मोटार सायकलवरून काम आटपून परतत असताना अज्ञात कारने पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर कुणाल रस्त्यावर पडल्याने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यास घासून रस्त्याच्या खाली फेकले. या गंभीर अपघातात कुणाल जागीच मरण पावला तर सुमंत दरेकर गंभीर जखमी झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, अपघातानंतर पोलिसांना कळवूनही संबंधित अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आरोपी वाहनाचा शोध घेण्यासाठी कोणतीही तात्काळ कारवाई किंवा कर्मचारी पुरविण्यात आले नाहीत. गावातील तरुणांनी स्वतःचे प्रयत्न करून रस्त्यावरील सीसीटीव्ही फूटेज शोधले, मात्र तांत्रिक माहितीचा अभाव व पोलिसांची मदत न मिळाल्याने उशीर झाला आणि अनेक ठिकाणचे फूटेज डिलीट झाल्याने तपासात अडथळा झाला. तसेच, पोलीस निरीक्षक शिंदे व तपासी अधिकारी यांनी अर्जदार व नातेवाईकांशी अपमानास्पद वागणूक केल्याचा, तसेच तक्रारदाराचा जबाब योग्य पद्धतीने न घेता धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. एक महिना झाला तरी तपास नाही ग्रामस्थां कडून आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरी आरोपी व वाहनाचा शोध नाही, अटक नाही व चौकशीची गती अत्यंत मंद आहे. आमच्या घरातील एकुलता एक मुलगा गमावला, तरीही पोलिसांनी मानवी भावनांचा विचार केला नाही अशी व्यथा मयताच्या वडिलांनी व्यक्त केली.

दरम्यान, तहसील कार्यालयातील उपोषण स्थळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून लेखी प्रसिद्धीपत्र देण्यात आले असून त्यात, आपले मागणी निवेदन प्राप्त झाले असून २५ जानेवारी २०२६ पर्यंत वाहनाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील व माहिती देण्यात येईल. आपण उपोषण सोडून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button