आम्ही बोलायला लागलो तर अवघड होईल : रवींद्र चव्हाण
उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा इशारा

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अजित पवार यांनी महायुतीत असूनही वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अलीकडे अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, “माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण ते सिद्ध झाले का? ज्यांनी माझ्यावर आरोप केले, तेच आज माझ्यासोबत सरकारमध्ये आहेत.” तसेच त्यांनी पुण्यात भाजपने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप करत, हा भ्रष्टाचार असल्याचा टोला स्थानिक भाजप आमदारांना लगावला.
या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी अजित पवारांना आठवण करून दिली की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्येच काम करत आहात.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी भाजप सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यात सरकार वेगाने काम करत आहे. कोरोना काळामुळे निवडणुका उशिरा झाल्या, पण आता त्या होत आहेत. गेल्या काही वर्षांत पुण्यात पायाभूत सुविधांना मोठी गती देण्यात आली आहे आणि कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे.
चव्हाण यांनी मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना सांगितले की, महापालिकेत ठराव होऊनही महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो सुरू झाली नाही. मात्र मोदी सरकार आल्यानंतर मेट्रो सुरू झाली आणि आज 33 किलोमीटरचे मेट्रो जाळे तयार झाले आहे. भविष्यात संपूर्ण पुण्यात मेट्रोचे जाळे पसरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासनही रवींद्र चव्हाण यांनी दिले.
रवींद्र चव्हाण म्हणाले, “खुद के गिरेबान में झाँक के देखिए. आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल.” तसेच तुम्ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात, हे नाकारता येईल का?



