देश - विदेश

मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण

भारत-मॉरिशस सांस्कृतिक नात्याला नवी उंची

 

लाँग माउंटन (मॉरिशस) : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रजागृतीचे दीपस्तंभ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांचा जागतिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण मॉरिशसमध्ये अनुभवास आला. लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य समारंभात मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकूल यांच्या हस्ते विद्यालय परिसरातील लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्येही दुसऱ्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

१९व्या शतकात भारतातून ऊस लागवडीसाठी गेलेल्या भारतीय कामगारांनी मॉरिशसच्या भूमीवर आपली संस्कृती, भाषा आणि परंपरा जपली. त्याच काळात भारतात लोकमान्य टिळक राष्ट्रीय चळवळीचे प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले. त्यांच्या विचारांचा प्रभाव मॉरिशसमधील भारतीय समाजावरही पडला आणि याच भावनेतून १९२६ मध्ये स्थापन झालेल्या हिंदी विद्यालयाला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात आले. शंभर वर्षांनंतर झालेला हा सोहळा टिळकांविषयीची अखंड श्रद्धा आणि भारताशी असलेल्या ऐतिहासिक नात्याचे प्रतीक ठरला.

या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी प्रसारणी सभेच्या अध्यक्षा रोहिणी रामरूप यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. यावेळी शिक्षण मंत्री महेंद्र गुणप्रसाद, आरोग्य व कल्याण मंत्री अनिल कुमार बाचू, संस्कृती मंत्री महेंद्र गुंडिया, भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, दिलीप ठाणेकर तसेच हिंदी प्रसारणी सभा आणि महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमान्य टिळक विचार मंच आणि शैलेश टिळक यांच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांना टिळकांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. या सोहळ्याला लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक, पणती अंजली राहळकर, खापरपणतू कुणाल टिळक आणि श्रुतिका कुणाल टिळक उपस्थित होते. या अर्धपुतळ्यांची निर्मिती शिल्पकार विवेक खटावकर यांचे पुत्र विपुल खटावकर यांनी केली आहे.

“भाषा हरवली तर संस्कृतीही हरवते” – राष्ट्रपती धर्मबीर गोकूल

समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती धर्मबीर गोकूल यांनी हिंदी प्रसारणी सभा आणि टिळक कुटुंबीयांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम भारत आणि मॉरिशस यांच्यातील सांस्कृतिक आणि भावनिक नात्याचा जिवंत पूल असल्याचे त्यांनी सांगितले. मॉरिशसमधील भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी हिंदी भाषेचे जतन अत्यंत आवश्यक असून, “आपली भाषा हरवली तर आपली संस्कृतीही हरवून जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मॉरिशस भेटींचा उल्लेख करत दोन्ही देशांमधील दृढ होत असलेल्या संबंधांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या ऐतिहासिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांचे अनावरण हे भारत आणि मॉरिशस यांच्यातील अतूट मैत्रीचे आणि लोकमान्यांच्या अमर विचारांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या नागरिकांपैकी अनेकांचे सांस्कृतिक मूळ महाराष्ट्राशी जोडले गेले असल्याने महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहेत. अशा कार्यक्रमांमुळे भारतीय वंशाच्या समाजाने उभारलेला सांस्कृतिक पूल अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकमान्य टिळक विद्यालयाचा शताब्दी महोत्सव हा केवळ एका शैक्षणिक संस्थेचा सोहळा नसून, शतकभर जपल्या गेलेल्या भारतीय संस्कृती, भाषा आणि राष्ट्रभक्तीच्या वारशाचा गौरव करणारा ऐतिहासिक पर्व ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button