छत्तीसगडमध्ये ₹९,५८० कोटींच्या गुंतवणूक; भारताच्या उद्योग क्षेत्राला मोठी चालना

नवी दिल्ली : देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड घडली असून छत्तीसगडमध्ये विविध क्षेत्रांत तब्बल ₹९,५८० कोटींच्या नवीन गुंतवणूक प्रस्तावांना गती मिळाली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच सुमारे ७,८०० थेट रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हैदराबाद येथे आयोजित ‘इन्व्हेस्टर्स कनेक्ट’ कार्यक्रमात सात प्रमुख कंपन्यांनी डेटा सेंटर, सेमीकंडक्टर व जीपीयू आर्किटेक्चर, सौर ऊर्जा उपकरण निर्मिती, वस्त्रोद्योग आणि औषधनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांमुळे भारताच्या उच्च-तंत्रज्ञान आधारित उत्पादन आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी गुंतवणूकदारांना उद्योग स्थापनेसाठी निमंत्रण पत्रे प्रदान केली. राज्यात सुलभ परवानगी प्रक्रिया, सिंगल विंडो प्रणाली, उत्तम पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक धोरणांमुळे छत्तीसगड गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. उद्योग क्षेत्रातील या घडामोडीमुळे भारताच्या आर्थिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीच्या उद्दिष्टांना नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

