भीमराव बाणखेले यांच्या ८५ व्या वाढदिवशी भावनांचा महापूर

बेल्हे; सुधाकर सैद : १९७३ व ७४ या जुन्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच येथील एका मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी सत्तरीकडे झुकलेले जवळपास ५० ते ५२ विद्यार्थी म्हणावे की जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे तत्कालीन शिक्षक भीमराव बाणखेले यांचा ८५ वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.
गुरू म्हणजे काळाच्या ओघात मागे राहणारी आठवण नसून आयुष्यभर सोबत राहणारा प्रकाश असतो, याची जिवंत अनुभूती श्रीबेल्हेश्वर माध्यमिक विद्यालय, बेल्हे येथील माजी शिक्षक भीमराव शंकरराव बाणखेले यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त अनुभवायला मिळाली.

१९७३, १९७४ व १९७५ सालच्या अकरावी व एसएससी बॅचचे विद्यार्थी तब्बल ५० ते ५२ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या गुरूंप्रती कृतज्ञतेचे ऋण व्यक्त करताना भावनाविवश झाले होते.
बेल्हे येथील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात सुमारे ५० ते ५२ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरूंच्या स्वागताने व सन्मानाने झाली आणि त्यानंतर जणू आठवणींचा झराच वाहू लागला. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी उभे राहून बाणखेले यांनी दिलेल्या शिस्तीच्या, संस्कारांच्या आणि माणूस घडवणाऱ्या शिकवणीच्या आठवणी सांगत होता. सरांचे शब्द, त्यांची नजर, त्यांचा विश्वास आजही आयुष्यात कसा मार्ग दाखवतो, याचे हृद्य अनुभव सांगताना अनेकांचे डोळे पाणावले होते.
“सरांनी आम्हाला फक्त धडे दिले नाहीत, तर सुसंस्कारीत आयुष्य कसे जगायचे हे शिकवले,” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, संयम आणि माणुसकी ही मूल्ये सरांच्या शिकवणीतून रुजली आणि त्याच भांडवलावर आजचे आयुष्य उभे राहिले असून त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी वेगळे वेगवेगळे वाटांनी आपले आयुष्य समृद्ध केले त्यामध्ये कोणी शासकीय अधिकारी कोणी बँक अधिकारी कोणी उद्योजक तर कोणी शेतीनिष्ठ घडले असून त्यातून आपल्या शिक्षकांचे व आपल्या गावाचे नाव त्यांनी मोठे केल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये राम बिचारे, नारायण चोरे, डी.बी.सैद, रामदास देशमुख, शफी मौलवी व इतरही अनेक उद्योजक व मोठमोठ्या हुद्द्यावरती काम करणारे व्यक्ति दिसून येतात. हे अनेक किस्स्यांतून स्पष्ट झाले. यानंतर बाणखेले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांप्रती अपार प्रेम आणि समाधान व्यक्त केले. “विद्यार्थी घडलेले पाहणे हेच शिक्षकाचे खरे यश असते,” अशा भावना त्यांच्याही शब्दांतून उतरल्या.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मनोहर कुलकर्णी, चंद्रकांत घोडके, रामदास देशमुख, ज्ञानेश्वर मुळे व भिमाजी गाडगे,बी. एल. पिंगट, भाऊ कदम, बबन खुटाळ, यांनी पुढाकार घेतला, मात्र या समन्वयकांपुरतेच हे आयोजन मर्यादित न राहता उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने काही ना काही जबाबदारी स्वीकारली व अतिशय आनंदाने, उत्साहाने पार पाडली. सर्वांच्या सहभागातून, आपुलकीतून आणि कृतज्ञतेतुन हा गुरू–शिष्य मेळावा अत्यंत भावस्पर्शी आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करत असताना आपल्या बेल्हे गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेसाठी काहीतरी भरीव मदत करण्याचे सर्वांनी ठरविले व भविष्यात परत भेटूच असे आश्वासन देऊन मोठ्या जड अंतःकरणाने प्रत्येकाने एकमेकाचा निरोप घेतला.



