साईकृपा पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

बेल्हे; सुधाकर सैद : बेल्हे गावातील सहकार क्षेत्रातील मानबिंदू ठरलेल्या व ठेवींचा उच्चांक गाठणा-या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा २५ वा वर्धापनदिन बुधवार (दि.१४ जानेवारी) संक्रांतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमामध्ये प्रवचन, सत्यनारायण व महिला सभासद व बिगर महिला सभासदांसाठी संक्रांत वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील भगिनींनी संक्रात वाण घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती आणि त्यांनी संस्थेच्या सर्व संचालकांना तिळगुळ देऊन संस्थेची भविष्यात अजून भरभराट होवो असा आशीर्वाद दिला.तसेच संस्थेला गेल्या २४ वर्षात विविध पुरस्काराने गौरविले असल्याचे व गरजू, गरीब महिला व पुरुष सभासदांना आर्थिक बळ देऊन सक्षम करण्याचे काम पतसंस्थेने केले असल्याचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांनी सांगितले, तसेच संस्थेचा बेल्हे येथील मुख्य कार्यालयासह पारगाव, आणे, साकोरी, बोरी, अळकुटी, निमगावसावा येथे शाखाविस्तार झाला असून भविष्यात अजुनही रांजणी व कवठेयमाई येथे शाखाविस्तार करण्याचे नियोजन असून संस्थेमार्फत स्वर्गरथ सेवाही उपलब्ध केली असल्याची माहिती उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी यावेळी दिली, तसेच सभासदांना प्रत्येक वर्षी लाभांशासह दिवाळी भेटीचे वाटप करण्यात येत असून संस्थेला सतत आॕडीट ‘अ’ वर्ग मिळत असून दरवर्षी १००% कर्जवसुली करणारी पंतसंस्था असा नावलौकिकही मिळविला असून सस्मित मुद्रेने सेवा देणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्याचे संस्थेचे खजिनदार बाळासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.
संस्थेने एनईएफटी आरटीजीएस सुविधा, मिनी एटीएम सुविधा, क्यू आर कोड सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सीबीएस संगणक प्रणाली, पिग्मी कलेक्शन ॲप सुविधा, दोन लाखापर्यंतचा अपघात विमा संरक्षण, सामाजिक उपक्रमात सतत सहभाग आणि लवकरच १०० कोटीच्या ठेवीकडे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे संस्थेचे सचिव सूर्यकांत गुंजाळ यांनी सांगितले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने परिसरातील मान्यवरांनी व अनेक सभासदांनी भेट देऊन सर्व संचालकांना तीळगुळ दिले व संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



