पुणे विभाग

समर्थ आयुर्वेद महाविद्यालयात ‘व्हाईट कोट सेरेमनी’

 

बेल्हे | सुधाकर सैद : समर्थ रूरल एज्युकेशनल इंस्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेद महाविद्यालय, बेल्हे येथे BAMS प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट सेरेमनी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सदानंद राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना एप्रन, स्टेथोस्कोप, डिसेक्शन बॉक्स व जर्नल्स यांचे किट प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या आणि सेवाभावाच्या प्रवासात औपचारिक प्रवेश केला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.राऊत म्हणाले की, प्रत्येक रुग्ण हा आपल्याला काहीतरी शिकवत असतो. नवीन अनुभव देत असतो. पैसे नाहीत म्हणून एखाद्याची चिकित्सा नाकारू नका. चिकित्सा करताना ती गरिबातील गरिबाला पण परवडेल याचा विचार करा. प्रत्येक डॉक्टर हा समाजाचा शिक्षक असतो त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे लोकांना आरोग्याचे शिक्षण देण्याची संधी सोडू नका तसेच आयुर्वेद व आधुनिक चिकित्सा पद्धतीतील मूलभूत फरक स्पष्ट करत भविष्यात इंटिग्रेटेड म्हणजेच संयुक्त चिकित्सा पद्धती अधिक प्रभावी ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानासोबतच सेवाभाव, नैतिकता व समाजाप्रती जबाबदारी जपण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील शिक्षण सहज उपलब्ध व्हावे त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हे लक्षात घेऊन समर्थ संकुलाची उभारणी केली. यामध्ये प्लेसमेंटही कायम चांगली राहिलेली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील गुगल, मायक्रोसॉफ्ट तसेच देशातील सिपला, इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. आयुर्वेद कॉलेज चालू करण्यामागे देखील समाजातील डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन बी.ए.एम.एस हा कोर्स सुरू करण्यात आला आहे व यातही उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, मा. जि. प. सदस्या स्नेहल शेळके, प्राचार्य डॉ.संजय लोंढे, कार्यालय अधिक्षक यशवंत फापाळे, रुग्णालय उपअधीक्षक डॉ.रमेश पाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल गायकवाड यांनी केले तर डॉ.रश्मी चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button