बेल्हे बस स्थानक फ्लेक्स च्या विळख्यात

बेल्हे | सुधाकर सैद : येथील एसटी बस स्थानकांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून तेथे लावलेल्या जाहिरातीच्या व इतर फ्लेक्समुळे प्रवाशांना बस स्थानक शोधावे लागत असून, त्या निवारा शेडमध्ये जाण्यासाठी रस्ताही राहिला नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत मोकळ्या रस्त्यावर, उन्हातान्हात व प्रसंगी पावसातही उभे राहावे लागत असून याची कुणाला खंतही वाटत नाही.
जिथे दुकाने, हातगाड्या, रिक्षा आणि इतर वाहने स्थानक हद्दीमध्ये अतिक्रमण करतात, ज्यामुळे बस थांब्यांवर उभे राहण्याची आणि चालण्याची जागाही शिल्लक राहत नाही. याकडे एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
या अतिक्रमणांमुळे बस चालकांना आणि प्रवाशांनाही त्रास होत असून स्थानकाचा वापर इतर कामांसाठीही केला जात असल्याने बसस्थानकांचा मूळ उद्देशच बाजूला पडल्यासारखा दिसून येत असून अहिल्यानगर ते कल्याण माळशेज मार्गे किंवा खंडाळा घाट मार्गे जाणाऱ्या एसटी बसेसची या ठिकाणी गर्दी असते परंतु या गर्दीवर नियंत्रण ठेवणारा परिवहन खात्याचा अधिकारीच या ठिकाणी नसल्याचे दिसून येत आहे आणि संबंधित वाहतूक नियंत्रण कार्यालयही बंद असल्याचे जाणवत असून यासंदर्भात नारायणगाव एसटी आगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.




