नातवाकडून 84 वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या; शेतातील काम करण्यास सांगितल्याचा राग
शिरूर तालुक्यातील बाबुळसर बुद्रुक येथे धक्कादायक घटना; काही तासांत आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

शिरूर ता. १५ : शेतातील काम करण्याबाबत सूचना दिल्याचा राग मनात धरून एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना शिरूर तालुक्यातील बाबुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. 15) सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत वृद्धाचे नाव दशरथ यशवंत राऊत (वय 84) असे असून, आरोपी नातू सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) याला शिरूर पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या राहत्या घरात ही घटना घडली. दशरथ राऊत यांनी नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, या कारणावरून संतापलेल्या सोमनाथने रागाच्या भरात घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार प्रहार केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या नातवाकडून आजोबांचा खून झाल्याची बातमी समजताच बाबुळसर बुद्रुक गावात शोककळा पसरली असून नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेत काही तासांतच त्याला ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुका हादरला असून, क्षुल्लक कारणातून घडलेल्या या घटनेने कौटुंबिक नात्यांमध्ये वाढत चाललेला तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.



