बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ३७ लोखंडी प्लेट चोरीप्रकरणी एक जेरबंद
पारगाव पोलिसांची धडक कारवाई

पारगाव ता. १५ : आंबेगाव तालुक्यातील नागापूर परिसरातून चोरीस गेलेल्या बांधकाम साहित्याचा छडा लावत पारगाव (कारखाना) पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत एका आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेल्या तब्बल ३७ लोखंडी प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालाची किंमत सुमारे २२ हजार २०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे नागापूर (मिंडेवस्ती), ता. आंबेगाव, जि. पुणे येथून बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ३७ लोखंडी प्लेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवगाव परिसरातील काझीपूर बुद्रुक फाट्यावरून एका चारचाकी वाहनातून चोरीचा माल वाहून नेला जात आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या बांधकाम साहित्याशी साधर्म्य असलेल्या लोखंडी प्लेट आढळून आल्या. चौकशीदरम्यान वाहन चालकाने आपले नाव अतिश दिलीप गव्हाणे (वय १९), रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे (मूळ रा. कोकर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे सांगितले.
पोलिसी चौकशीत आरोपीने नागापूर येथून लोखंडी प्लेट चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा त्याने आपल्या साथीदार रतन मांगीलाल राठोड, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे याच्या मदतीने केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या एकूण ३७ लोखंडी प्लेट जप्त केल्या. या कारवाईमुळे बांधकाम साहित्य चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून परिसरातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शशांक कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकेरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश काळेकर तसेच पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अंभोरे, चंद्रकांत गव्हाणे आणि पोलीस मित्र रामदास वाघुंडे यांनी सहभाग घेतला. चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अल्पावधीत मालासह आरोपीला जेरबंद करण्यात पारगाव (कारखाना) पोलिसांना यश आल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



