वेदांता समूहाच्या वारशाचा प्रश्न ऐरणीवर
अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी कोण?


देशातील दिग्गज उद्योगपती तथा वेदांता उद्योग समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल (वय 49) यांचे निधन झाले आहे. या दु:खद घटनेमुळे उद्योगजगतात शोककळा पसरली असून अनिल अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर आता वेदांता समूहाची पुढील धुरा कोण सांभाळणार, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
अनिल अग्रवाल यांनी अत्यंत मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभा केलेला वेदांता उद्योग समूह आज देशातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक मानला जातो. धातू, खाणकाम, ऊर्जा, इंधन आदी विविध क्षेत्रांमध्ये वेदांताने आपली भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे. 1976 साली अनिल अग्रवाल यांनी वेदांता रिसोर्सेसची स्थापना केली. सुरुवातीला ही एक छोटी केबल कंपनी होती. मात्र, काळानुसार त्यांनी या कंपनीचा विस्तार करत तिला जागतिक स्तरावर नेले.
अगदी कमी वयात अनिल अग्रवाल यांनी आपल्या वडिलांसोबत उद्योगविश्वात पाऊल ठेवले. अथक परिश्रम, जोखीम घेण्याची तयारी आणि योग्य निर्णयक्षमतेमुळे त्यांनी कोट्यवधींचे औद्योगिक साम्राज्य उभे केले. आज अनिल अग्रवाल हे वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक अध्यक्ष असून ते देशातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जातात.
फोर्ब्सच्या यादीनुसार अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे 35 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळेच अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर या प्रचंड उद्योगसमूहाचा वारसा कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अग्निवेश अग्रवाल यांच्या निधनानंतर प्रिया अग्रवाल यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रिया अग्रवाल या सध्या Vedanta आणि Hindustan Zinc या कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. त्या हिंदुस्तान झिंक या कंपनीच्या प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योगक्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि नेतृत्वगुण पाहता भविष्यात वेदांता समूहाची प्रमुख जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे कुटुंबावर शोककळा असताना, दुसरीकडे वेदांता समूहाच्या भविष्याबाबत उद्योगजगतात चर्चा सुरू आहे. अनिल अग्रवाल यांनी उभारलेले हे कोट्यवधींचे साम्राज्य पुढे कोणत्या दिशेने जाणार, याकडे देशातील उद्योगविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

