कोकणराजकीय

राणे परिवारात राजकीय शिमगा

मंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांच्यातील वादावर नितेश राणेंचे स्पष्टीकरण

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | तळकोकणातील तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. “राणे कुटुंब म्हणजेच सिंधुदुर्ग” असे समीकरण असताना, याच निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी प्रचारापासून अंतर राखल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यामागचे कारण दोन्ही पुत्रांमधील कथित संघर्ष असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवरच नारायण राणेंनी शेजारच्या जिल्ह्यात जाऊन राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याने राज्यभरात खळबळ उडाली आणि “राणे संपणार?” अशा चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले.

या सगळ्या चर्चांवर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी पहिल्यांदाच सविस्तर आणि ठाम भूमिका मांडली आहे. साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी राणे कुटुंबातील जिव्हाळा, दोन भावांमधील नातेसंबंध, निवडणुकांदरम्यान झालेल्या संघर्षाच्या चर्चांपासून ते वडील नारायण राणेंच्या निवृत्तीच्या अफवांपर्यंत सर्व मुद्द्यांवर रोखठोक उत्तरे दिली. यासोबतच कोकणाच्या विकासावर आणि मुंबईच्या महापौरपदाबाबतही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राणे कुटुंब सर्वाधिक चर्चेत राहिले. मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातील शीतयुद्ध, एका भावाने राखलेला राजकीय गड आणि दुसऱ्याला आपल्या होमपिचवर बसलेला धक्का, यामुळे कुटुंबात सर्व काही सुरळीत नाही असे चित्र निर्माण झाले होते. त्यातच नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिल्याने या चर्चांना आणखी जोर आला.

निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढत असताना नितेश आणि निलेश राणे यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत होते. हा वाद इतका वाढला की संघर्ष पेटल्यासारखे वातावरण निर्माण झाले. निकालानंतर निलेश राणेंनी “एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद” अशी भावना व्यक्त केली होती. तर नितेश राणेंनी पराभव मान्य करत विकासासाठी सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली. मात्र त्यानंतर केलेल्या एका ट्वीटमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले.

या सर्व पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी थेट खुलासा करत सांगितले की, दोन्ही भावांमध्ये कोणताही वैयक्तिक वाद नाही. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले, त्यामुळे हा संघर्ष “नितेश विरुद्ध निलेश” नसून “भाजप विरुद्ध शिवसेना” असा होता. दोघेही आपापल्या पक्षाची भूमिका बजावत होते. जर कुणी दुसऱ्या पक्षाची बाजू घेतली असती, तर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता, म्हणूनच ठाम भूमिका घ्यावी लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.

नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चांवरही नितेश राणेंनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. “निवृत्तीचे संकेत आम्हाला कळलेच नाहीत. ते स्वतः निवृत्त होणारे नाहीत, उलट ते अजून अनेकांना निवृत्त करतील,” असे त्यांनी सांगितले. नारायण राणे अजूनही दिवसाला दहा ते बारा तास काम करतात, त्यांच्या डिक्शनरीमध्ये ‘निवृत्ती’ हा शब्दच नाही. त्यांनी आपल्या भाषणात ‘मी गप्प बसेन’ असे म्हटले, तो केवळ समजावण्याचा त्यांचा खास अंदाज होता. प्रत्यक्षात ते अजून अनेक इनिंग खेळण्यासाठी सज्ज असून “पॅड बांधून तयार आहेत,” असा ठाम विश्वासही नितेश राणेंनी व्यक्त केला.

एकूणच, राणे कुटुंबातील संघर्ष, फूट आणि निवृत्तीच्या चर्चांवर नितेश राणेंनी स्पष्ट भूमिका मांडत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. कोकणाचा विकास आणि राज्याच्या राजकारणात राणे कुटुंबाची भूमिका पुढेही महत्त्वाची राहणार, हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button