पुणे विभाग

श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची घोडदौड कायम

निमगाव सावा येथे संस्थेची सातवी शाखा सुरू

 

बेल्हे, सुधाकर सैद : उत्तर पुणे जिल्ह्याच्या व जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे येथील एक प्रथितयश पतसंस्था असा नावलौकिक असलेल्या पतसंस्थेच्या सातव्या शाखेचा उद्घाटन समारंभ निमगाव सावा येथे नुकताच जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व इतरही अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ, सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी साईकृपा पतसंस्थेने आपल्या कामातून आपला ठसा उमटवला असून, त्यांच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावलेला दिसत आहे. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध गावात शाखा उघडून सहकाराचे जाळे वृद्धिंगत केले आहे. पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे आर्थिक विषयक प्रश्न सुटत असून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम पतसंस्था करत असतात. पतसंस्था या आताच्या घडीला समाजाचा एक आर्थिक कणा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. साईकृपा परिवार आणि बेनके परिवाराचं एक दृढ आणि जवळकीचं नातं आहे.

सुरुवातीला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या संपूर्ण लेखाजोखा मांडला व संस्थेचा आतापर्यंतचा आढावा मान्यवर व सभासदांपुढे ठेवताना निमगाव सावा ही संस्थेची सातवी शाखा असून, कवठे यमाई व रांजणी या ठिकाणी शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. याप्रसंगी बाळासाहेब खिलारी बेल्हेच्या विद्यमान सरपंच मनिषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, वैभव काळे, गुळंचवाडीचे सरपंच अतुल भांबेरे, विजय महाराज खाडे, शरदचंद्र पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र औटी, जिल्हा परिषद पुणेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, समर्थ शैक्षणिक संकुलचे वल्लभ शेळके, मनोहर पिंगट, संस्थेचे माजी संचालक निवृत्ती गटकळ यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सभासद व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button