क्राईमपुणे विभागमहाराष्ट्र

७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर ता. १५ : तब्बल ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला अखेर शिक्रापूर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. तीन दिवस सातत्याने पाठलाग करून तांत्रिक माहिती आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला चाकण येथून जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२१ रोजी शिक्रापूर परिसरात बेकायदेशीर गुटखा वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी सुमारे ७८ लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी ९ जुलै २०२१ रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) याच्यासह एकूण १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा उघडकीस आल्यानंतर गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असलेला बापू गवते फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा अनेकवेळा शोध घेतला; मात्र तो वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता.

दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली. यावेळी आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली. सलग तीन दिवस पाठलाग करून तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे सापळा रचत गवते वस्ती येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पाच वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याने गुटखा तस्करीविरोधातील पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. सध्या आरोपीकडे सखोल चौकशी सुरू असून या गुन्ह्याशी संबंधित इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि गुटखा तस्करीच्या जाळ्याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस कर्मचारी सोमनाथ कचरे, गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांच्या पथकाने केली.

गुन्हा कितीही जुना असला तरी कायद्याचा हात लांब असतो,” याची प्रचिती पुन्हा एकदा शिक्रापूर पोलिसांच्या या कारवाईतून आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button