नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक प्रतिनिधी | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून पक्षांतराचे सत्र जोरात सुरू आहे. प्रचारालाही सुरुवात झाली असून राज्यातील प्रमुख नेते विविध ठिकाणी सभा घेत आहेत. अशातच नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीपूर्वी घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी महापालिका निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीन भोसले यांच्यासोबत महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले आणि पृथ्वीश भोसले यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेचा संघटनात्मक बळ अधिक मजबूत झाले आहे.
तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेची वाट धरल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशांमुळे नाशिक महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
© समर्थ भारत वृत्तसेवा / Samarth Bharat News Network


