पतीची भाजपशी बंडखोरी, बायको गेली माहेरी
नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर पक्षासोबत


नागपूर प्रतिनिधी | नागपूर महापालिका निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून एका बंडखोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपविरोधात पतीने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पत्नीने थेट घर सोडल्याची घटना समोर आली आहे. भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर या आता पतीच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्याने बंडखोरीचे सूर उमटत असून, या नाराज नेत्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बंडखोरांची मनधरणी करत असले तरी नागपूरमधील एक बंडखोरी मात्र चांगलीच चर्चेत आली आहे.
भाजपने प्रभाग क्रमांक 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिल्याने अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर नाराज झाले. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना तिकीट कापल्यामुळे त्यांनी थेट पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यामुळे अर्चना डेहनकर यांच्यासमोर पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय असा कठीण पेच उभा राहिला.
भाजपप्रती निष्ठा राखत अर्चना डेहनकर यांनी पतीचा निर्णय अमान्य केला. त्यांनी पतीचे घर सोडून नागपुरातील भावाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 ते 2012 या काळात भाजपमुळे महापौरपद मिळाल्याने पक्षाच्या विरोधात जाणे त्यांना मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता त्या भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करताना पतीच्या विरोधात उभ्या राहणार आहेत.
दरम्यान, नागपूरमध्ये आणखी एका बंडखोरीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आणि संघाच्या एकनिष्ठ स्वयंसेवकाच्या मुलानेही बंडखोरी केली आहे. निनाद दीक्षित यांनी प्रभाग 22 डी मधून फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला आहे. संघ मुख्यालयाच्या परिसरातील या बंडखोरीमुळे भाजपची कसोटी लागणार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे राजकीय बंडखोरी तर दुसरीकडे कौटुंबिक संघर्ष, यामुळे नागपूर महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
©समर्थ भारत वृत्तसेवा /Samarth Bharat News Network



