पुणे विभागमहाराष्ट्र

महावितरणच्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात राजे ग्रुप आक्रमक; चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी

नारायणगाव, ता. 23 : महावितरणकडून राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात नारायणगाव परिसरात नागरिकांचा रोष वाढत असून, याप्रकरणी राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य आक्रमक झाले आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता, पूर्वसूचना न देता तसेच खोटी माहिती देऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत राजे ग्रुपने नारायणगाव पोलीस ठाण्यास निवेदन देऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी एजन्सींवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजे ग्रुपचे अध्यक्ष जुबेर शेख आणि सचिव विजय घेगडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नारायणगाव परिसरातील अनेक नागरिकांकडून स्मार्ट मीटर बसविताना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून व एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ग्राहकांची संमती न घेता विद्यमान वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांना योग्य माहिती न देता अथवा दिशाभूल करून मीटर बदलण्याची प्रक्रिया राबविणे हे नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राजे ग्रुपने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

  • नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा पूर्वसूचना न देता बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटर प्रकरणांची सखोल चौकशी करावी.
  • फसवणूक, दिशाभूल किंवा जबरदस्ती झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व एजन्सी प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करावेत.
  • नागरिकांना धमकावणे अथवा दबाव टाकण्याच्या प्रकारांना तात्काळ आळा घालावा.
  • भविष्यात मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देऊन त्यांची संमती घ्यावी.
  • परवानगी न घेता काढून नेण्यात आलेले जुने मीटर पुन्हा बसवून द्यावेत.
  • प्रक्रियेत पारदर्शकता येईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम स्थगित करावी.

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

निवेदनात राजे ग्रुपने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, या निवेदनावर आठ दिवसांच्या आत समाधानकारक लेखी उत्तर आणि योग्य कारवाई न झाल्यास ग्रामस्थ व नागरिकांच्या वतीने मोर्चा काढून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, जुन्नर विभागीय पोलीस अधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय, ऊर्जा मंत्री कार्यालय तसेच विविध लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेली नाराजी आणि राजे ग्रुपने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे नारायणगाव परिसरातील हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button