विद्युत वाहिनीच्या तारांची चोरी करणारा सराईत जेरबंद; ४.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
अवसरी खुर्द परिसरातील सलग तार चोरी प्रकरणाचा उलगडा; मंचर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मंचर | प्रतिनिधी
अवसरी खुर्द येथील खेडकर मळा परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्युत वाहिनीच्या अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा अखेर मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तब्बल ४ लाख ४० हजार रुपयांच्या किंमतीच्या ११०० किलो वजनाच्या अॅल्युमिनियम तारांचे बंडल जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द येथील खेडकर मळा परिसरात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील विद्युत वाहिनीच्या तारांची चोरी होत असल्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत होत्या. याप्रकरणी फिर्यादी मयूर दत्तात्रय खेडकर (वय ३५, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
फिर्यादीनुसार, दिनांक २६ मे २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी विद्युत वाहिनीवरील अॅल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरून नेले होते. चोरीचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने मंचर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
मंचर पोलिसांकडून कसून चौकशी
मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संजय नाडेकर तसेच पोलिस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार आणि हनुमंत ढोबळे यांनी तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान पोलिसांनी विजय भाऊसाहेब गायकवाड (वय ४६, रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या अॅल्युमिनियम तारांचे बंडल जप्त केले.
४.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अटकेत असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेला ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ११०० किलो अॅल्युमिनियम तारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात मंचर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक यशवंत यादव, पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संजय नाडेकर, नंदकुमार आहारी, शेखर भोंईर तसेच पोलिस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार आणि हनुमंत ढोबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, आरोपीकडून आणखी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांबाबत माहिती मिळते का याचा तपास सुरू असून, पुढील तपास पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे करीत आहेत. विद्युत वाहिनीच्या तारांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला मंचर पोलिसांनी बेड्या ठोकत ४.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



