क्राईमपुणे विभागमहाराष्ट्र

मित्रांनीच मित्राचा केला घात; खुनातील दोन आरोपींना ४८ तासांत बेड्या

काळेपडळ पोलिसांची वेगवान कारवाई; तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद

 

पुणे | प्रतिनिधी :

मित्रत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मित्रांनीच आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याप्रकरणी फरार झालेल्या दोन आरोपींना कालेपडळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत शोधून अटक केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश भारती झांडे (वय ३१) हा तरुण तालीम चौक, गणेश मंदिराशेजारी, हांडेवाडी येथे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कालेपडळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित इसम संतोष बदन टकले (रा. हांडेवाडी, पुणे) आणि साहिल अर्जुन कचरावत (रा. हांडेवाडी, पुणे) यांच्यावर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान या दोघांनी मिळून आकाश झांडेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा उघडकीस येताच दोन्ही आरोपी फरार झाले होते.

दरम्यान, तपास पथक आरोपींच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून होते. मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असतानाच पोलिस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुण्यातील येवलेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांचा माग काढत असल्याची चाहूल लागताच आरोपी वारंवार ठिकाण बदलत होते.

तरीही काळेपडळ पोलिसांनी शिताफीने सापळा रचत आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर दोघांनाही ताब्यात घेण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा झाला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिसमल ६, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासाचे नेतृत्व कालेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे कालेपडळ पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणले असून, मित्राच्या खुनाचा बदला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button