कुंभमेळ्यापूर्वी श्री भीमाशंकर मंदिर परिसरातील ९० टक्के कामे पूर्ण होणार : मुख्यमंत्री

भीमाशंकर ता. १३ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र भीमाशंकर मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार महेश लांडगे आणि आमदार बाबाजी काळे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भीमाशंकर मंदिर परिसर विकास आणि सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम अत्यंत वेगाने आणि उच्च दर्जाने सुरू असल्याचे सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील सुमारे ९० टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्यामुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
१५० कुटुंबांचे पुनर्वसन; उभारणार आदर्श गाव
परिसर विकासासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पासाठी सुमारे १५० घरे स्थलांतरित करण्यात येत असून, या सर्व कुटुंबांना मंदिर परिसरालगतच उत्तम सुविधा असलेली जागा देऊन एक आदर्श गाव विकसित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भीमाशंकरला येणारे भाविक या नव्या गावालाही भेट देतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता या प्रकल्पात आहे,” असे फडणवीस म्हणाले.
वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय
भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग विकसित करण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय, मंदिर परिसरातील दुकानदारांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करून दुकाने सुव्यवस्थित पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण परिसराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ अनुभव देण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाकालपेक्षा वेगळा ‘नैसर्गिक कॉरिडोअर’
उज्जैनच्या महाकाल लोक कॉरिडोअर प्रकल्पाशी तुलना करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भीमाशंकरचा विकास आराखडा पूर्णपणे वेगळा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, महाकाल कॉरिडोअर शहरी भागात विकसित झाला आहे; मात्र भीमाशंकर परिसर घनदाट जंगल, जैवविविधता आणि अभयारण्याने समृद्ध आहे.
निसर्गाला कोणताही धक्का न लावता, उलट जैवविविधता आणि वनसंवर्धनाला चालना देणारा विकास हा आमचा उद्देश आहे. शिवशंकराच्या या पवित्र स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य जपत येथे एक अद्वितीय आणि पर्यावरणपूरक ‘नैसर्गिक कॉरिडोअर’ विकसित करण्यात येत आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
धार्मिक पर्यटनाला नवी दिशा
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भीमाशंकर हे केवळ ज्योतिर्लिंगाचे तीर्थक्षेत्र न राहता धार्मिक, पर्यावरणीय आणि पर्यटन विकासाचे आदर्श केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कुंभमेळ्यापूर्वी बहुतांश कामे पूर्ण झाल्यास लाखो भाविकांना आधुनिक सुविधा आणि अधिक सुकर दर्शनव्यवस्था उपलब्ध होणार आहे.



