पुणे विभागमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून भीमाशंकर येथील विकासकामांचा आढावा

कुंभमेळ्यापूर्वी प्रकल्प पूर्णत्वाकडे

भीमाशंकर ता. १४ : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार अतुल बेनके, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, माजी सरपंच दिनेश खेडकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणी आणि परिसर विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्य शासनाने भीमाशंकर विकास आराखड्यासाठी मोठा निधी मंजूर केला असून भाविकांसाठी अधिक सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे, भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता प्रकल्प तसेच प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ संकल्पनेचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकर परिसराचा धार्मिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विकासकामे करताना परिसरातील जैवविविधता आणि धार्मिक पावित्र्य अबाधित राखण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर सुमारे १७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत हेरिटेज मार्केट, स्वच्छता सुविधा, ई-व्ही शटल सेवा, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि इतर मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. वाढत्या भाविकसंख्येला लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र मार्गांचीही उभारणी केली जात आहे.

दरम्यान, अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भीमाशंकर विकास प्रकल्पाची पाहणी करत आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी सुमारे ९० टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. या प्रकल्पामुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अनेकपटींनी वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकासकामांच्या गुणवत्तेबाबत सूचना देत कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला. भीमाशंकरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन महत्त्व लक्षात घेता हा प्रकल्प पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button