कांदळीतील कथित ‘सांस्कृतिक कलाकेंद्राचा’ पर्दाफाश; ‘कलाकेंद्राच्या नावाखाली कुंटणखाना सुरू’ असल्याचा गंभीर आरोप
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड कलाकेंद्रावर धडकल्या

नारायणगाव ता. १० : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी येथील एका कथित सांस्कृतिक कलाकेंद्रात सुरू असलेल्या गैरप्रकारांचा अन्याय तिथे प्रतिकार संघटनेच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांनी पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. संबंधित कलाकेंद्रात परवानगीच्या अटींचे उघड उल्लंघन करून अभद्र नृत्यप्रकार, डीजे साउंड सिस्टमचा वापर आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणारे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कलाकेंद्राला पारंपरिक वाद्यांच्या साथीने पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे डीजे साउंड सिस्टमच्या दणदणाटात अश्लील व अंगविक्षेपयुक्त नृत्य सादर केले जात असून, उपस्थित ग्राहकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप स्वाती गायकवाड यांनी केला आहे.

याबाबत गायकवाड यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित केले. या माध्यमातून त्यांनी तेथील कथित गैरप्रकार जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी विविध भागांतून आलेले अनेक जण दारूच्या नशेत अभद्र वर्तन करत असून, तेथील तरुणींसोबत आक्षेपार्ह प्रकार घडत असल्याचे दिसून आले.
हे कोणतेही सांस्कृतिक कलाकेंद्र नसून कलाकेंद्राच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखानाच आहे,” असा थेट आरोप गायकवाड यांनी केला. तसेच या ठिकाणी अनेक तरुणींसह अल्पवयीन मुलींकडूनही कथितरित्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
स्वाती गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ८ जून रोजी संबंधित कलाकेंद्रावर धडक देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी उपलब्ध चित्रीकरणासह नारायणगाव पोलिसांकडे तक्रार करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्याबाबत पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. संबंधित कलाकेंद्राविरोधात कोणती कारवाई होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



