पुणे विभाग

वीज वितरण कर्मचारी होत आहेत जनतेच्या रोशाचे धनी

बेल्हे | सुधाकर सैद : पोलीस, लष्करी जवान आणि वीज वितरण कर्मचारी यांना जनतेच्या सेवेसाठी २४ तास सजग राहावे लागत असून जनतेची सेवा हाच त्यांच्यासाठी दुवा असतो. त्यातही वीज वितरण कर्मचारी प्रत्येक क्षणाला आपला जीव धोक्यात टाकून जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज राहत असतो.महावितरण कर्मचारी एक प्रकारे चोवीस तास समाजाप्रती बांधील असतो, अचानक वीज पुरवठा खंडित झाला तर मग वेळ कोणतीही असो या कर्मचाऱ्यांना रागाचे धनी व्हावे लागते. त्याच बरोबर आजकाल गल्लीबोळात स्वयंघोषित पुढाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून एखाद्या मोठ्या नेत्याचे नाव घेऊन वितरण कर्मचाऱ्यांना घरच्या कामगारासारखे नको ते शब्द वापरून सर्वसामान्य लोकांमध्ये आपला वट किती आहे हे भासविण्याचा प्रयत्न करत असतात. खूप वेळा वीज बिल न भरलेल्या लोकांकडे बिलाच्या वसुलीला गेले असता हे लोक कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, दादागिरी, शिवीगाळ सुद्धा करतात.

वीज वितरण कर्मचाऱ्यांना एखाद्या कस्पटाप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे जाणवत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुमच्या सर्व दैनंदिन गरजा पुऱ्या होतात. घरातील उजेडापासून ते तुमच्या दळणकांडापर्यंत सर्वकाही आज विजेवर अवलंबून आहे व त्या प्रमाणात येणारे वीज बिल भरणे हेही आपलं कर्तव्य आहे परंतु विजेचा गैरवापर करणे, विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करणे, वायरिंग मध्ये काहीतरी उलटापालट करणे व त्यातून आपले बिल कमी करण्याचा प्रयत्न जवळपास ७० ते ८०% जनता करत असते परंतु या प्रकाराची वीज वितरण कर्मचाऱ्यांकडे सर्व माहिती त्यांच्या संगणकावरती नोंद होत असते आणि त्यानुसार एखाद्या ग्राहकाचा वीज वापर एखाद्या महिन्याला अचानक जर कमी झाला तर त्या ठिकाणी शंका येण्यास वाव असतो आणि यावेळेस त्या त्या विभागाचा अभियंता आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी चौकशी करण्यास पाठवत असतो आणि अशा वेळेस त्या ग्राहकाच्या घरी अथवा त्याच्या आस्थापनात चौकशी करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाच्या किंवा जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागत असते. त्यावेळेस तो ग्राहक सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोरीची तक्रार नोंदविण्यासही मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनात कारवाई करण्याची धास्ती बसलेली असून प्रत्येक वेळी त्यांना पोलीस संरक्षण मिळेलच अशीही शक्यता नाही. त्यामुळे वितरण कर्मचारी या अशा कारवाईसाठी टाळाटाळ करतात असे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक की जो मीटर मध्ये कोणती छेडछाड न करता किंवा वायरिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा उलटपालट न करता वीज वापरत असेल आणि प्रत्येक महिन्याला आपले वीज बिल वेळेवर भरत असेल त्याच्या मनात नक्कीच याविषयी कुठेतरी द्विधा अवस्था निर्माण होत असते, कारण आपण प्रत्येक वेळी वीज बिल वेळेवर भरत असून काही लोक कुठल्याही प्रकारचे वीज बिल न भरता वीज फुकट वापरत असल्याचे दिसून येत असल्याने त्याच्या मनात असूया निर्माण होते आणि आपणही तसाच काहीतरी प्रकार करावा असे त्याच्या मनात येते.

वीज वितरणचे कर्मचारी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे तिन्ही त्रिकाळ जनतेच्या सेवेसाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम करत असतात. त्यामुळे आपल्याला यांच्या कामाच्या बाबतीत गोड बोलता येत नसेल तर टीकाही करू नका कारण टीका करण्याचा अधिकार आपल्याला नाही कारण वीज वितरणचे कर्मचारी जे काम करत असतात, त्याची कल्पना त्यांनाच असते, घरातल्या खुर्चीवर बसून वर पंख्याची हवा चालू असताना तुम्हाला ते कळणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button