श्रीभैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सप्ताह

बेल्हे | सुधाकर सैद : येथील बाजारतळावर असणा-या अतिशय जागृत व बेल्हे गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्रीभैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या सप्ताह आणि मंदिर कलशारोहण द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात मंगळवार दि. ३/२/२०२६ होणार असून दि.१०/२/२०२६ मंगळवारपर्यंत चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कालखंडात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देव, देश, धर्म व संस्कृती टिकविण्यासाठी सध्याच्या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही. वै.ह.भ.प.कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशिर्वादाने व ह.भ.प.पांडुरंगमहाराज घुले, ह.भ.प.तुळशिराम महाराज सरकटे यांच्या प्रेरणेने गेली २५ वर्षे अव्याहतपणे हा अखंड हरिनाम यज्ञ चालू आहे.त्या निमित्ताने पहाटे काकडाभजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ व संध्याकाळी हरिकिर्तना नंतर थोर व उदार अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.या सप्ताहकालात ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव , वैभव महाराज शिंदे, नवनाथ महाराज माशेरे, ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली), ऍड. कृष्णा महाराज चवरे, डॉ. जगदीश महाराज जोशी, सचिन महाराज ढोले, व पांडुरंगमहाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
मंगळवार (दि.१०) रोजी शोभेच्या दारुकामाच्या आतषबाजीत व सनई ताफ्याच्या सुरात भव्य अशी श्रींच्या पालखीची मिरवणूक निघणार असून बुधवार (दि.११) व गुरुवार (दि.१२) रोजी बैलगाड्यांच्या भव्य इनामी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा समितीचे जानकू डावखर, प्रदीप पिंगट, सुभाष भुजबळ, स्वप्निल भंडारी यांनी दिली. या हरिनाम सप्ताहास व दोन दिवस चालणाऱ्या यात्रेस परगावी राहणारे चाकरमाणी, व्यवसायिक व उद्योजक उपस्थित राहणार असून आपल्या गावच्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन कुटूंबासह कुलाचाराचे विधी करणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी समस्त ग्रामस्थ बेल्हे, मुंबईकर, पुणेकर व आजूबाजूच्या सर्व वाड्यावस्त्यावरील मंडळांचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा २६ वा अखंड हरिनाम सप्ताह व मंदिर कलशारोहण द्वितीय वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असून, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि तन, मन, धन सेवेच्या रूपाने अर्पण करून या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा असे भैरवनाथ यात्रा व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.



