भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची सारवासारव

लातूर | प्रतिनिधी
लातूर ही अशी भूमी आहे जिथून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर नेतृत्व मिळाले आहे. या भूमीवरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. काँग्रेस आमची राजकीय प्रतिस्पर्धी असली, तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “लातूरने शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखे मोठे नेते दिले आहेत. त्यामुळे या भूमीचा गौरव सांगताना मला कोणताही संकोच नाही.”
रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, “आमचे अध्यक्ष दोन दिवसांपूर्वी येथे आले होते. ते बोलताना कदाचित शब्द चुकीच्या पद्धतीने मांडले गेले असतील. त्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले. मात्र त्यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता.”
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, “आपल्या उत्साहाकडे पाहिल्यानंतर विलासराव देशमुख यांच्या आठवणी येथून शंभर टक्के पुसल्या जातील,” असे वक्तव्य केले होते. यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये जाहीर सभेत स्पष्टीकरण देत भाजपची भूमिका मांडली.



