चेन स्नॅचिंगच्या मालिकेचा पर्दाफाश; दोन सराईत गुन्हेगार जेरबंद, साडेसहा तोळे सोने व दुचाकीसह 10.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पारगाव कारखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आंबेगाव-शिरूर परिसरातील आठ गुन्हे उघडकीस

पारगाव | प्रतिनिधी
आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा अखेर पारगाव कारखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, पल्सर मोटारसायकल आणि अन्य मुद्देमाल असा एकूण 10 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवाडी येथे 27 मे 2026 रोजी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेपासून या तपासाला सुरुवात झाली. गडकवाडी (ता. खेड) येथील 65 वर्षीय सिंधुबाई बाळू घाडगे या वृद्ध महिला खडकवाडी परिसरात असताना दोन अज्ञात चोरटे पल्सर मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पसार झाले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
150 सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधला आरोपींचा माग
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. आरोपींनी तोंडावर काळे मास्क आणि डोक्यावर टोपी घातल्याने त्यांची ओळख पटविणे आव्हानात्मक होते. चोरीनंतर आरोपींनी वापरलेल्या मार्गाचा शोध घेताना पोलिसांनी कॅनॉल रस्ते, चारीचे मार्ग तसेच वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या विविध रस्त्यांवरील तब्बल 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान संबंधित मोटारसायकल कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरानंतर कोणत्याही फुटेजमध्ये दिसत नसल्याचे आढळले. त्यामुळे आरोपी याच भागातील असावेत, असा पोलिसांचा संशय बळावला.
गोपनीय माहितीवरून आरोपीची ओळख पटली
तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोपनीय माहितीदाराची मदत घेण्यात आली. त्यातून मोटारसायकलवरील मागील व्यक्ती हा अजय देवकर उर्फ भोऱ्या (रा. देवकरवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याचा तसेच शिरूर पोलीस ठाण्यात खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
दीड किलोमीटर पाठलाग करून पकडला
अजय देवकर सध्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार संजय साळवे आणि मंगेश अभंग यांनी त्याच्या घरावर धाड टाकली. मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तब्बल एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले आणि पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात आणले.
चौकशीत आरोपीने आपल्या साथीदार ओंकार शेंडगे (रा. डोंगरगण, ता. शिरूर) आणि आतिश दिलीप गव्हाणे (रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली.
आठ गुन्ह्यांची उकल
आरोपींकडून झालेल्या चौकशीत खालील आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
- पारगाव कारखाना पोलीस ठाणे – गु.र.नं. 59/2026
- रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे – गु.र.नं. 165/2026
- रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे – गु.र.नं. 186/2026
- शिरूर पोलीस ठाणे – गु.र.नं. 514/2026
- शिरूर पोलीस ठाणे – गु.र.नं. 555/2026
- शिरूर पोलीस ठाणे – गु.र.नं. 556/2026
- शिरूर पोलीस ठाणे – गु.र.नं. 515/2026
- शिक्रापूर पोलीस ठाणे – गु.र.नं. 425/2026
पोलिसांच्या चिकाटीला यश
आरोपींचा माग काढण्यासाठी केलेली सीसीटीव्ही तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांचे जाळे यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली. ग्रामीण भागातील चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात या कारवाईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, अमोल वडेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे तसेच पोलीस मित्र रामदास वाळुंज यांनी पार पाडली.
आंबेगाव-शिरूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश करत पारगाव कारखाना पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप उमटवली आहे.



