पुणे विभागमहाराष्ट्र

पुणे-नाशिक रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी; माजी गृहमंत्री तथा आमदार वळसे पाटलांनी रेल्वेमंत्र्यांपुढे मांडला शास्त्रशुद्ध आराखडा

मंचर ता. १७ : पुणे–नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा चाकण–खेड–आंबेगाव–जुन्नर–संगमनेर–नाशिक हा मूळ प्रस्तावित मार्ग कायम ठेवण्यात यावा, यासाठी माजी गृहमंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले आहे. रांजणगाव येथे झालेल्या या भेटीत वळसे पाटील यांनी रेल्वे प्रकल्पाचे आर्थिक, सामाजिक आणि प्रादेशिक महत्त्व अधोरेखित करत मूळ मार्गात बदल न करण्याची मागणी केली.

वळसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात पुणे–नाशिक रेल्वे मार्ग हा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प असल्याचे नमूद केले आहे. या रेल्वेमुळे पुणे आणि नाशिक यांतील संपर्क अधिक वेगवान होईल, प्रवासी व मालवाहतूक सुलभ होईल, उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

GMRT संदर्भातील आक्षेपांवर वैज्ञानिक उपायांचा आग्रह

खोडद येथील जागतिक दर्जाच्या GMRT (Giant Metrewave Radio Telescope) संशोधन केंद्राच्या जवळून रेल्वे मार्ग जात असल्याने काही आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, GMRT चे संरक्षण आणि रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी ही परस्परविरोधी उद्दिष्टे नसून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन्ही बाबी साध्य करता येऊ शकतात, अशी ठाम भूमिका वळसे पाटील यांनी मांडली आहे.

यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दोन महत्त्वपूर्ण संदर्भ दस्तावेजही सादर केले. त्यामध्ये BARC, TIFR आणि DRDO या संस्थांशी संबंधित राहिलेले माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मोहन फडणीस यांनी लिहिलेला “Proposed Nashik–Pune Railway Line and Dr. Homi Bhabha’s Historic Research Project” हा लेख तसेच “Pune-Narayangaon-Nashik Railway: Why a GMRT-Compatible Railway Corridor May Be More Feasible Than Route Diversion” ही तांत्रिक अभ्यास टिपण समाविष्ट आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात

निवेदनासोबत जोडलेल्या अभ्यासामध्ये रेल्वे मार्गामुळे GMRT वर होणारा संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी विविध तांत्रिक उपाय सुचविण्यात आले आहेत. यामध्ये Electromagnetic Compatibility (EMC) तंत्रज्ञान, Fiber Optic Communication Systems, Shielded Railway Electronics, Continuous RFI Monitoring, विशेष सिग्नल फिल्टरिंग तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. तसेच अत्यंत संवेदनशील भागांमध्ये बोगदा (Tunnel) उभारण्यासारखे पर्यायही नमूद करण्यात आले आहेत.

जगातील विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधन केंद्रे आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था यांचा यशस्वी समतोल साधण्यात आल्याची उदाहरणे देत, पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पासाठीही तशाच प्रकारचे तांत्रिक उपाय अवलंबता येऊ शकतात, असे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड आणि संगमनेरच्या विकासाचा प्रश्न

पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग कायम राहिल्यास आंबेगाव, जुन्नर, खेड, संगमनेर आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यास या रेल्वे प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे वळसे पाटील यांनी नमूद केले आहे.

पाठपुरावा सुरूच राहणार

पुणे–नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच मार्गी लागावा यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. “विज्ञानाचे संरक्षण आणि विकासाची गती या दोन्ही बाबींचा समतोल साधणारा मार्ग शोधणे हीच आमची भूमिका आहे,” असे त्यांनी निवेदनाद्वारे अधोरेखित केले.

दरम्यान, पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाबाबत सुरू असलेल्या चर्चेला वळसे पाटील यांच्या या निवेदनामुळे नवे वळण मिळाले असून, रेल्वे मंत्रालय याबाबत काय भूमिका घेते याकडे आता आंबेगाव, जुन्नर, खेड आणि संगमनेर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button