महाराष्ट्रराजकीय

तुकाराम मुंढे यांची बदली करू नका; त्यांनी भ्रष्ट व्यवस्थेला चांगलाच दणका दिलाय – मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांवरून आता राजकीय आणि भेसळखोर माफियांच्या स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांची बदली करू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागात काम करताना अनेक गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, नियमांचे उल्लंघन करणारे उद्योग आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात त्यांनी धडक मोहिमा राबवल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहारांना मोठा आळा बसला आहे.

जे अधिकारी प्रामाणिकपणे आणि जनहितासाठी काम करतात, त्यांनाच वारंवार बदलीचा सामना करावा लागतो. तुकाराम मुंढे यांनी लोकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर कठोर भूमिका घेतली असून त्यांनी भ्रष्ट व्यवस्थेला चांगलाच दणका दिला आहे. अशा अधिकाऱ्यांची बदली करणे योग्य ठरणार नाही,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA विभागाने अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाच्या औषधांचा साठा आणि नियमबाह्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली होती. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून अनेक सामाजिक संघटनांनीही त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत अधिकृत निर्णय अद्याप समोर आलेला नसला तरी या विषयावर आता भेसळखोर आणि माफिया यांच्याकडून आयुक्त मुंढे यांच्या बदलीसाठी दबाव तयार होऊ लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी वेग मिळाला असून राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ मिळाले पाहिजे, शिक्षा नव्हे,” असे सांगत जरांगे पाटील यांनी सरकारने मुंढे यांची बदली टाळावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button