पुणे विभागमहाराष्ट्रराजकीय

डिंभे बोगद्याला कडाडून विरोध; पुणे-नाशिक रेल्वेसाठी पर्यायी मार्गाची मागणी.

दिलीपराव वळसे-पाटील यांची सरकारकडे तातडीच्या बैठकीची मागणी

मंचर ता. १५ : डिंभे धरणातील (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) प्रस्तावित बोगदा प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी या बोगद्याला ठाम विरोध दर्शवत सरकारने तातडीने सर्व संबंधित विभागांची बैठक बोलवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, डिंभे धरण परिसरातील प्रस्तावित बोगद्याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे. काही ठिकाणी पाझर दिसून येत असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सखोल अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणी आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचाही स्वतंत्रपणे उल्लेख केला. रेल्वे प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी हा मार्ग खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यालगतून नेण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी मागणी केली. रेल्वेमुळे विकासाला चालना मिळणार असली तरी स्थानिक जनतेच्या हिताचा विचार प्रथम झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

वळसे-पाटील यांनी सांगितले की, डिंभे बोगदा आणि पुणे-नाशिक रेल्वे या दोन्ही विषयांवर यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या दोन्ही विषयांवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button